‘ गुडबाय आम्ही जग सोडून जातोय ‘ , भावाने सासरी धाव घेतली अन त्यानंतर..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना उघडकीला आली असून बुलढाणा तालुक्यातील करडी येथे एका तीस वर्षीय विवाहितेने धरणाच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली आहे. सदर महिलेचा मृतदेह आढळून आलेला असून तिच्यासोबत तिने अकरा वर्षाची मुलगी आणि नऊ वर्षाचा मुलगा यांना देखील घेऊन ती गेलेली होती. दोन्ही मुलांच्या चपला धरण परिसरात आढळून आल्या अन त्यानंतर त्यांचेही मृतदेह काही तासांनी आढळून आले.

उपलब्ध माहितीनुसार धरणाच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यानंतर सदर प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आणि मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मयत महिलेचा भाऊ शरद कौतिकराव दामोदर ( वय 35 राहणार फरदापुर जिल्हा औरंगाबाद ) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यामध्ये आपली बहीण सरिता हिला तिचा पती ज्ञानेश्वर पैठणे हा सातत्याने त्रास देत होता असे म्हटलेले आहे. ज्ञानेश्वर पैठणे हा संशयी स्वभावाचा होता आणि त्यातून त्याने अनेकदा आपल्या बहिणीला त्रास दिला. पैशावरून तिला मारहाण देखील केली म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असे म्हटले आहे.

27 जुलै रोजी तिने आपल्या भावाच्या मोबाईलवर ‘ गुडबाय आम्ही जग सोडून जातोय ‘ असा मेसेज पाठवला होता म्हणून शरद यांनी त्यांच्या दाजीला फोन लावला असता त्याने सकाळी पहाटे पाच वाजताच सरिता ही अकरा वर्षीय आणि नऊ वर्षीय मुली मुलाला घेऊन गेलेली आहे असे सांगितले म्हणून शरद यांनी तात्काळ तिच्या सासरी धाव घेतली असता ती आढळून आली नाही.

शरद हे पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असताना सरिता यांचे पार्थिव धरणाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची बातमी त्यांना समजली आणि त्यांनी पोलिस ठाण्यातच हंबरडा फोडला. सासरच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आहे असे तक्रारदार यांचे म्हणणे असून मयत महिलेचा पती ज्ञानेश्वर पैठणे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Spread the love