आतापर्यंत तो मी नव्हेच प्रकरणात एका पुरुषाने अनेक महिलांची लग्न करून फसवणूक केल्याचे प्रकार समोर आलेले आहेत मात्र सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे. एक महिला चक्क ‘ ती मी नव्हेच ‘ अशी भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तासगाव येथील एका खासगी रुग्णालयातून एका एक दिवसाच्या बालकाचे अपहरण करण्यात आले होते या प्रकरणी संशयीत स्वाती छबुराव माने ही वेगवेगळी उत्तरे देत असल्याने पोलीस देखील संभ्रमित झालेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, स्वाती छबुराव माने हे या महिलेचे माहेरचे नाव असून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील ती तिचे माहेर आहे. तिचे वडील छबुराव माने यांनी तिचा विवाह माढा तालुक्यातील शिवाजी मुटकुळे यांच्यासोबत करून दिला होता मात्र 2003 मध्ये ही विचित्र वागायला लागली आणि ती तिचा पति शिवाजी मुटकुळे आणि माहेरचे व्यक्ती यांच्यासोबत संपर्क तोडून गायब झालेली होती. त्यानंतर सुमारे वीस वर्ष ती माहेर आणि सासर कुठल्याच व्यक्तीच्या संपर्कात नव्हती म्हणून अखेर तिचे वडील यांनी जावई शिवाजी मुटकुळे यांचे दुसरे लग्न लावून दिले.
स्वाती हिला तिच्या पहिल्या पतीपासून दोन मुले झाली होती त्यांचे देखील आता लग्न झालेले आहे. दरम्यानच्या काळात स्वाती ही सोलापूर जिल्हा सोडून सांगली जिल्ह्यात राहायला गेली आणि तिने विटा येथील एका व्यक्तीसोबत संसार थाटला. त्याच्यासोबत काही दिवस राहिल्यानंतर त्याने तिने दीड वर्षांपूर्वी जितेंद्र थोरात नावाच्या एका व्यक्तीशी पुन्हा विवाह केला होता.
सध्याच्या परिस्थितीत ती पोलीस कोठडीत असून तिने तिचे वय 28 वर्षे सांगितले होते मात्र तिचे वय 40 पेक्षा जास्त दिसून येत आहे असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. पहिला पति सोडल्यानंतर तिने दोन जणांशी केलेला घरोबा हा वादग्रस्त ठरलेला असून तिचा तिसरा पती जितेंद्र थोरात हा तिला फेसबुकवर भेटला होता त्यानंतर ती त्याच्या घरात राहायला गेली मात्र त्याच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते म्हणून आपल्याला मूल झालेले आहे हे दाखवण्यासाठी तिने खाजगी रुग्णालयातील एका एक दिवसाच्या बाळाचे अपहरण केले असण्याची देखील शंका व्यक्त करण्यात येत असून सांगलीत तिची जोरदार चर्चा आहे.