युट्यूबवर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ कन्टेन्ट येत असून त्यामध्ये काही कन्टेन्ट चक्क गुन्हेगारी प्रवृत्तीला उत्तेजन देणारे आहे. लहान मुलांच्या देखील हातात मोबाईल आल्यावर त्याचे काही दुष्परिणाम समोर येत असून अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे समोर आलेली आहे. काही अल्पवयीन मुलांनी युट्युबवर चक्क चोर कसे बनवायचे आणि चोरी कशी करायची हे सर्च केल्यानंतर दुचाकी वाहन पळवून कसे लपवायचे याचा देखील मन लावून अभ्यास करून एक कारनामा केलेला आहे. सदर प्रकरणी तीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर बालके ही विधिसंघर्षग्रस्त बालके असून नववी आणि दहावीमध्ये शिकत आहे. क्लासेसच्या निमित्ताने युट्युबवर त्यांनी एक व्हिडीओ लावला आणि त्यामध्ये चोरी कशी करायची अन केलेली चोरी कशी लपवायची याबाबत केवळ मौजमजा म्हणून हे व्हिडिओ पाहिले आणि त्यानंतर प्रात्यक्षिक म्हणून दुचाकी वाहनाची चोरी केली. आतापर्यंत त्यांनी तीन दुचाक्या चोरलेल्या असून मित्र परिवारामध्ये बढाई मारताना त्यांनी ही घटना सांगितली आणि त्यानंतर उमरेड पोलिसांनी सदर प्रकरणी त्यांना ताब्यात घेतलेले असून त्यांच्या पालकांना बोलावून समुपदेशन करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.