एकाच दिवसात लग्नाचे शेकडो प्रस्ताव अन गावाकडून सत्कारही , तरुण सध्या जेलमध्ये

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना जालना जिल्ह्यात समोर आलेली असून राज्यात कर आयुक्तालय यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये खाडाखोड करून स्वतःचे खोटे बनावट पत्र बनवून ते व्हायरल करून आपण विक्रीकर उपायुक्त झाल्याचा डांगोरा पिटणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रामेश्वर पंढरीनाथ लोखंडे ( राहणार कोदोली तालुका भोकरदन जिल्हा जालना ) असे या तरुणाचे नाव असून तो एका दुकानात आधार कार्ड लिंक करून देणे तसेच ऑनलाइन अर्ज भरून देणे अशा स्वरूपाची कामे करतो. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सरकारी नोकरी मिळवून मोठ्या पदावर कार्यरत होण्याची त्यांची इच्छा होती मात्र त्यात त्याला अपयश आल्याने मित्रांमध्ये बढाई मारण्यासाठी त्याने हा भलताच प्रताप केला. काही मित्रांच्या मदतीने त्याने लोकसेवा आयोगाचे खोटे पत्र तयार केले आणि आपण एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन विक्रीकर उपायुक्त झालेलो आहोत अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली

मोठ्या प्रमाणात त्याचा मित्र वर्ग असल्याने अवघ्या काही मिनिटातच ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आणि ग्रामस्थांनी देखील त्याच्या सत्कारासाठी मोठी तजवीज केली आणि त्याच्या घरासमोर देखील गर्दी केली. लग्नासाठी अनेक जणांनी त्याला तात्काळ विचारपूस देखील सुरु केली मात्र त्याचा आनंद काही काळच टिकला आणि आणि तो बोगस असल्याचे समोर आल्यावर भोकरदन पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.