महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना कोल्हापूर इथे उघडकीस आली आहे. दोन तोंडाचा मांडूळ साप देण्याचं आमिष दाखवून कोल्हापुरातील दोघांना बुलडाण्यात बोलावून पैसे लुटण्यात आले आणि मारहाण करण्यात आली . त्यात चक्क कोल्हापुरातील एका माजी सैनिकाचा जीव गेला आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. आरोपींनी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधत संबंधित दोघांना दोन तोंडाचा मांडूळ साप देण्याचं आमिष दाखवलं असल्याचे तपासात समोर आले आहे .
उपलब्ध माहितीनुसार, अनिल आनंदा निकम आणि माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील अशी मारहाण झालेल्या दोघांची नावं आहेत . फेसबुकच्या माध्यमातून त्यांचा आरोपींशी संपर्क झाला होता. पवार नावाच्या व्यक्तीनं दोन तोंडाचा मांडूळ देण्याचं त्यांना आमिष दाखवलं आणि त्यासाठी पैसे घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा इथे त्यांना बोलावलं. दोघंही नांदुरा इथं पोहोचल्यानंतर आरोपीनं दोघांना घेऊन जायला दुचाकी पाठवली. दोघांनाही तीन किमी आतमध्ये बाभळीच्या जंगलात नेलं आणि मारहाण करत आरोपींनी दोघांकडून 1 लाख 6 हजार रुपयांची रोकड काढून घेतली.
अनिल आनंदा निकम आणि माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील यांनी मांडूळ मागणी करताच त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि दोघांनाही झाडाला उलटं टांगून बेदम मारहाण सुरु केली. या मारहाणी माजी सैनिक प्रल्हाद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला . इतके सगळे होऊन देखील आरोपींचे समाधान झाले नाहीच उलट त्यांनी निकम यांच्या नातेवाईकांना फोन पेवरून काही रक्कम पाठवायला लावून एटीएममधून रक्कम काढून घेतली आणि त्यांनतर आरोपींनी संबंधित दोघांना पूर्णा नदीच्या पुलावर आणून पुलावरून खाली फेकलं.
जखमी अवस्थेत निकम विव्हळत पडलेले असताना अनेक जणांना त्यांनी मदत मागितली मात्र यांना कोणी मदत केली नाही मात्र अखेर एका ॲम्ब्युलन्स चालकाने त्यांना उचलून नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केलं. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करत प्रल्हाद पाटील यांना मृत घोषित केलं. जखमी अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून नांदोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.