महाराष्ट्रात एक घटना कोल्हापूर येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच उघडकीला आणली होती. हातकणंगले येथील एका शिक्षकाच्या मोबाईलवर चक्क पाकिस्तान जिंदाबाद असे स्टेटस आढळून आल्यानंतर त्याच्याविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जावेद अहमद ( मूळ राहणार जम्मु ) असे त्याचे नाव असून एका खाजगी शाळेत तो शिक्षक म्हणून काम करत होता. त्याचे हे स्टेटस लक्षात आल्यानंतर प्रशासनाने त्याची हकालपट्टी देखील केलेली आहे.
जावेद अहमद हा सदर शाळेत इंग्रजी विषय शिकवत होता आणि तिथेच परिसरात एक खोली भाड्याने घेऊन तो राहत होता. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस असतो त्यावेळी त्याने पाकिस्तान जिंदाबाद अशा स्वरूपाचे स्टेटस त्याच्या मोबाइलला ठेवलेले होते. त्याच्या नंबरवर स्टेटस पाहिल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आणि प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले.
जिल्हा पोलिस प्रमुख आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी तात्काळ या शिक्षकाला ताब्यात घेतले असून 5 ऑगस्ट रोजी देखील या शिक्षकाने मोबाईलवर जम्मू-काश्मीर ब्लॅक डे असा डीपी ठेवलेला होता. सदर शिक्षकाची पोलीस कसून चौकशी करत असून त्याने हा प्रकार का केला याचा तपास सुरू आहे.