आजकाल लोक पैसे कमावण्यासाठी काय करतील याचा भरवसा राहिलेला नाही. अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीस आली असून एका उच्चभ्रू कुटुंबातील चक्क 62 वर्षीय महिलेला सायबर ठगांनी तब्बल 4.42 लाखाला गंडा घातला आहे. संबधित महिला व्यापारी कुटुंबातील असून गणेशखिंड रोड येथे वास्तव्यास आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, सोशल नेट्वर्किंग साईट्सवरून तिची एका अनोळखी व्यक्तीसोबत ओळख झाली. सोशल मीडियावरून मित्र झालेल्या व्यक्तीने तो इंग्लडचा रहिवाशी असल्याचं महिलेला सांगितलं होत. त्यांच्या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि त्यानंतर पुढे फोन नंबरची देवाण घेवाण झाली आणि दोघे एकमेकांशी व्हाट्सएप्पवर तासनतास बोलत असायचे. त्यातून एकमेकांचे वाढदिवस कधी असतात ही देखील माहिती शेअर झाली..
सदर व्यक्तींने पीडितेला तिच्या 24 एप्रिलच्या वाढदिवसादिवशी महागडे गिफ्ट पाठवत आहे मात्र ते सोडून घेण्यासाठी तुला काही रक्कम भरावी लागेल असे पटवून दिले आणि महिलेला विश्वासात घेऊन बँक अकाऊंट सारख्या गोष्टींची माहिती काढून घेतली. त्यानंतर वेळोवेळी संपर्क करत तिला भुलवत चक्क 4.42 लाख रुपयांची रक्कम काढून घेतली आणि सर्व संपर्क बंद करून टाकले.
कॉल करण्यासाठी देखील त्याने बनावट सिम वापरल्याचे समोर आले आहे तर त्याने उकळलेले पैसे हे नोएडा येथील दोन खासगी बँकेत जमा झाले असल्याची माहिती चतुश्रुंगी पोलिस स्थानकांचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी दिली आहे.