पोलीस आपली ड्युटी इमानेइतबारे करत असतात आणि न्यायालयाचे समन्स बजावणे हा त्यांच्या रोजच्या कामकाजाचा भाग असतो मात्र आपल्या दारात पोलिस आलेला कुणालाच आवडत नाही आणि त्यातून पोलिसांसोबत दुर्दैवाने उद्धट वर्तन करण्यात येते. अशीच एक घटना औरंगाबाद शहरानजीक वाळूज येथे समोर आलेली असून न्यायालयाचे समन्स बजावण्यासाठी गेलेल्या वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संतोष वाघ यांना आरोपीच्या भावाने धक्काबुक्की करून गेटच्या बाहेर हाकलून देण्याचा प्रकार 22 तारखेला सकाळी सिडको मध्ये घडलेला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, न्यायालयाकडून निघालेल्या समन्स बजावण्याचे काम हे पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ हे करत असतात. अशाच पद्धतीने कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून ते आरोपी श्रीपाल देवकरण कावडीया यांच्याकडे समन्स बजावण्यासाठी गेले होते. दोन दिवस चकरा मारून देखील घराला कुलूप असल्याने सोमवारी सकाळी पुन्हा कॉन्स्टेबल त्यांच्या घरी गेले त्यावेळी बराच वेळ दरवाजा ठोठावला नंतर एका महिलेने दरवाजा उघडला आणि कॉन्स्टेबल वाघ यांनी त्यांचे ओळखपत्र दाखवत श्रीपाल कावडिया यांना समन्स बजावण्यासाठी आलेलो आहे असे सांगितले मात्र त्या महिलेने श्रीपाल कावडीया इथे राहत नाहीत असे सांगितले .
इतक्यात एक अनोळखी तरुण घराच्या बाहेर आला आणि त्याने पोलिस कॉन्स्टेबल वाघ यांना ‘ आम्ही काय चोर आहोत का ? आता गुपचूप इथून निघून जा ‘ अशी धमकी दिली तसेच धक्काबुक्की करून गेटच्या बाहेर हाकलले. वाघ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणी माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता तो आरोपीचा भाऊ कुशल असल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत .