दुचाकीच्या स्पार्क प्लगला जिलेटीनच्या कांड्या जोडून मारण्याचा होता प्लॅन मात्र ..

Spread the love

नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बारागाव नांदूर येथे एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून जिलेटिनच्या दोन कांड्या स्पार्क प्लगला जोडून बॉम्ब स्फोट घडवून तरुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे . थोडे अंतर गेल्यानंतर मोटरसायकल बंद पडली म्हणून होणारा घातपात टळला असून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बाळासाहेब मंडलिक असे या तरुणाचे नाव असून 25 तारखेला सकाळी आठ वाजता दुचाकीवर ते कामाला गेले होते. शेतीचे काम आटोपल्यानंतर जनावरांसाठी घास घेऊन जात असताना मुळा धरणाच्या भिंतीवर त्यांची गाडी अचानक बंद चालू होऊ लागली त्यानंतर त्यांनी गाडी थांबून पाहिले असता दोन जिलेटिनच्या कांड्या स्पार्क प्लगला जोडून कनेक्शन केले होते त्यानंतर त्यांनी मित्रांशी संपर्क केला आणि दुचाकीच्या जिलेटिनच्या कांड्या व्यवस्थितरित्या काढण्यात आल्या.

सदर प्रकाराची पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस हवालदार हनुमंत आव्हाड हे घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांनी देखील या वेळी दाखल होत या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोध घेण्याचे आवाहन पोलिसांना केले. पोलिसांनी त्यानंतर लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात येईल असे आश्‍वासन दिलेले असून पोलिस तपास सुरू असल्याचे समजते. मासेमारी करण्यासाठी परिसरात सर्रास जिलेटीनचा वापर केला जात असून धरणाला देखील यामुळे धोका निर्माण झाला आहे तर मासे खाणाऱ्या नागरिकांच्या देखील जीविताला धोका आहे.


Spread the love