‘ आमच्या बापूंना सोडा ‘ , बलात्कारी आसारामसाठी भक्तांचा पुण्यात मोर्चा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात सध्या तुरुंगात असलेला आसाराम सध्या आजन्म जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला अटक करून नऊ वर्ष पूर्ण झालेली असून या कालावधीत त्याला जामीन अथवा पॅरोल मिळाला नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण दाखल करून त्याला न्याय मिळावा म्हणून श्रीयोग वेदांत सेवा समिती पुणेच्या भक्तमंडळी तर्फे मंगळवारी पुण्यात मूक मोर्चाचे आयोजन केले होते त्यावेळी सुमारे पाच हजार जण या मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी ‘ बापूजी को रिहा करो ‘, ‘ नही सहेंगे अत्याचार झुठे आरोपों का बहिष्कार ‘ अशा प्रकारचे घोषणांचे फलक आपल्यासोबत घेतले होते. देशातील न्यायव्यवस्था संथ प्रक्रियेने चालत असून न्याय मिळण्यास विलंब होत आहे याची शासन आणि समाजाने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. सदर मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी काढण्यात आला होता आणि त्यानंतर राष्ट्रपतींसाठी निवेदन हे जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम सध्या जेलमध्ये असून 2013 साली आसाराम याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. शहाजहांपुर येथील पीडित कुटुंबीय हे आसाराम याचे भक्त होते. सात ऑगस्ट 2013 ला पीडित मुलीच्या वडिलांना छिंदवाडा येथील आश्रमातून तुमची मुलगी आजारी पडलेली आहे असा फोन आला होता. त्यानंतर तिचे आई-वडील गुरुकुलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना तुमच्या मुलीला भूतबाधा झालेली आहे. आसाराम ही भूतबाधा घालवू शकतात असे सांगण्यात आले.

पीडित मुलीचा परिवार हा पूर्णपणे अंधभक्त असल्याने त्यांनी तात्काळ या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि 14 ऑगस्टला पीडित मुलीचे कुटुंबीय तिला सोबत घेऊन आसाराम याला भेटण्यासाठी त्याच्या जोधपूर येथील आश्रमात गेले होते. तिथे त्याने अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार केला असा गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला होता.