देशात एक वेगळाच गुन्हा उघडकीला आलेला असून अवघा एक कप चहा आणि पेटीएमवरून टॅक्सीचालकाला दिलेले शंभर रुपये यावरून हा गुन्हा उघडकीला आलेला आहे. तब्बल साडेचार कोटी रुपयांचे दागिने योजनाबद्ध पद्धतीने लुटण्यात आले होते मात्र लुटलेल्या दागिन्यांचा आनंद एक दिवसही घेतला घेता आला नाही. अवघ्या 24 तासात दिल्ली पोलिसांनी आरोपींच्या हातात बेड्या ठोकल्या असून शंभर रुपयांचा डिजिटल व्यवहार, दोनशे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल ट्रेकिंग याच्या माध्यमातून पोलिसांनी चार दरोडेखोरांना जयपूर इथे बेड्या ठोकल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, दिल्लीतील पहाडगंज भागात बुधवारी सकाळी लुटमारीची घटना घडली होती . त्यावेळी एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून दोन कर्मचारी बाहेर पडले. त्यांचा पाठलाग करत त्यांना अडवण्यात आले. ही कुरियर कंपनी दागिने आणि महागड्या वस्तू यांचीच डिलिव्हरी करण्याचे काम करते. कुरियरमधील कर्मचाऱ्यांना अडविल्यानंतर त्यातील एक साध्या पोलिसाच्या वेशात होता आणि त्याने त्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यातील दोन जणांनी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यानंतर तिथून पलायन केले.
पोलिसात प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी तब्बल 200 सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी मागील पंधरा दिवसांपासून हे लुटारू या कुरियर कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत होते हे लक्षात आले. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आरोपींनी नजर ठेवलेली होती. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी हा चहाच्या टपरीवर सकाळच्या वेळी चहा घेताना दिसला आणि एका टॅक्सीचालकाला थांबून त्याने त्याच्याकडून शंभर रुपये घेतले होते. पोलिसांनी चहावाल्या कडे चौकशी केली त्यावेळी लुटारूकडे चहा पिण्यासाठी रोख रक्कम नव्हती म्हणून त्याने एका टॅक्सी चालकाला थांबवून त्याला पेटीएमने शंभर रुपये दिले आणि त्याच्याकडून शंभराची नोट घेतली.
पोलिसांसाठी हा क्ल्यू सर्वाधिक महत्त्वाचा होता त्यानंतर पोलिसांनी पेटीएमच्या ऑफिसला संपर्क साधला आणि त्या लुटारूचा फोन नंबर आणि इतर माहिती काढली. त्यामध्ये तो नजफगड येथील रहिवासी असल्याचा असल्याचे समोर आले. पोलिस पथकाने छापा टाकला त्यावेळी तो तिथून फरार झालेला होता मात्र तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचे मोबाईल लोकेशन शोधण्यात पोलिसांना यश आले आणि एका अपार्टमेंटमधून चारही जणांना ताब्यात घेण्यात आले.