पुणे येथे एक खळबळजनक घटना समोर आलेली असून नदीपात्रात एका पस्तीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला आहे . भिडे पुलाजवळ हा मृतदेह सापडला असून मयत व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. डेक्कन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वर्दळीचे ठिकाण असलेल्या भिडे पूल येथे हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये देखील दहशत पसरली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, गणेश सुरेश कदम असे मयत व्यक्तीचे नाव असून ते शनिवार पेठ येथे राहायला होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही घटना समोर आली आणि तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केलेला असून डेक्कन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेमागचे कारण आणि आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
गणेश सुरेश कदम यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय असून शनिवार पेठ येथे त्यांचे लॉन्ड्रीचे दुकान आहे. रविवारी संध्याकाळी त्यांना एक फोन आला होता त्यानंतर ते घराबाहेर पडले मात्र पुन्हा घरी आलेच नाहीत. त्यांची शोधाशोध सुरू असताना अचानकपणे त्यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. पूर्वीच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा अंदाज असून पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केलेली आहे.