महाराष्ट्रात एक अत्यंत संतापजनक अशी घटना जालना जिल्ह्यात उघडकीला आलेली असून झोपेत असलेल्या आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या मुलीला एका निर्दयी पित्याने शेततळ्यात फेकून दिले आहे. जालना तालुक्यातील निधोना परिसरात ही घटना उघडकीला आलेली असून श्रावणी जगन्नाथ डवले असे या चिमुकलीचे नाव आहे.
उपलब्ध माहितीनुसार, जगन्नाथ डवले हा मूळचा सिल्लोड तालुक्यातील गव्हाणे येथील रहिवासी असून एका शेतात मजूर म्हणून काम करत होता. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याची पत्नी शेतात इतर महिलांबरोबर कामाला गेली होती मात्र त्याआधी जगन्नाथचे तिच्या सोबत भांडण झाले होते त्यामुळे तो संतापात होता. पत्नी कामाला गेल्यानंतर त्याने त्याच्या दीड वर्षांच्या मुलीला सोबत घेतले आणि शेत तळ्यात फेकून दिले .
काही वेळाने आपण मुलीला फेकून दिले आहे असे सांगितल्यानंतर आईने तिकडे धाव घेतली आणि सदर प्रकरणी चंदनजिरा पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले मात्र आई आणि वडील हे दोघेही काहीच बोलायला तयार नव्हते मात्र पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने मुलीला फेकल्याची कबुली दिलेली असून पोलिसांनी या चिमुरडीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढलेला आहे.