देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना मध्य प्रदेशात उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये एका इंजिनिअरने पत्नीला जीवे मारण्यासाठी ती बाथरूममध्ये आंघोळ करत असताना पाण्यात करंट सोडला मात्र महिलेचे नशीब देखील बलवत्तर होते आणि सुदैवाने तिचा जीव वाचला. महिलेने आरोप लावला आहे की, दुसरं लग्न करण्यासाठी इंजिनिअर पतीने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला . सदर महिला सध्या रुग्णालयात दाखल आहे.
उपलब्ध माहितीनुसार, खरगोन शहरातील बिस्टान रोडवरील ब्रिज विहार कॉलनीमध्ये हे दाम्पत्य रहात होते . सदर महिलेचा पती हा देखील एका वीज कंपनीत ज्यूनिअर इंजिनिअर आहे. हा धक्कादायक प्रकार त्याने चक्क दुसरे लग्न करावे म्हणून केला असल्याची प्राथमीक माहिती आहे. महिलेला दोन मुलं असून पत्नी नेहा आणि मुकेशचं २०१३ मध्ये लग्न झालं होतं मात्र मुले झाल्यानंतर त्याच्यात खटके उडू लागले आणि त्यातूनच पतीने हा प्रकार केला असल्याचे पत्नीचे म्हणणे आहे .
पीडित महिला नेहा हिच्या म्हणण्यानुसार, पती मुकेश डावर तिला अनेकदा मारहाण करत होता. ती आंघोळीला बाथरूममध्ये गेली होती. त्यावेळी मुकेशने बाथरूममध्ये करंट सोडला आणि नळ सुरू केला. मला शॉक लागला तर मी जोरात ओरडले. आजूबाजूच्या लोकांनी मला कसंतरी बाहेर काढलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पती मुकेश हा पोलिसात प्रकरण दाखल होताच फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.