महाराष्ट्रात आरोग्य सुव्यवस्थेचा चांगलाच बोजवारा उडालेला असून कोरोना काळात देखील हे पाहायला मिळाले होते त्यानंतर देखील आरोग्य व्यवस्थेत काहीही अमुलाग्र बदल घडलेले नसून यातूनच एक दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर परिसरात उघडकीला आली आहे. दसऱ्याच्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता एका महिलेला छातीत कळा येऊ लागल्या. उलट्या देखील झाल्या मात्र दवाखान्यात नेण्यासाठी नदी पार करण्याची गरज होती. गावातील चार-पाच लोकांनी तिला झोळीत बसून नदी पार केली मात्र या कालावधीत बराच उशीर झाल्याने महिलेला प्राण गमवावे लागले आहेत.
सदर दुर्दैवी घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात असून अमळनेरला आणेपर्यंत महिलेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. तिथे पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले असून आदिवासी समाजातील या महिलेच्या मृत्यूबद्दल परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. उषाबाई रामलाल भिल ( वय 53 ) असे मयत महिलेचे नाव आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून सात्री गावाला जायला रस्ता नाही तर बोरी नदीवर पूल देखील नाही त्यामुळे नागरिकांना बोटीत बसून प्रवास करावा लागतो. अनेकदा आंदोलने करून देखील प्रशासनाला जाग आली नाही फक्त काही तरी तांत्रिक अडचणी दाखवून ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात येत आहे . याआधी देखील अकरा वर्षीय बालिकेचा मृत्यू झालेला होता मात्र प्रशासनाने त्यावेळी बोट आणून ठेवलेले आहे त्यातून प्रवास करा असे सांगत ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले होते. आता तरी प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत .