महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना जालना जिल्ह्यात उघडकीला आली होती. धान्य विक्रीसाठी विरोध करणाऱ्या आईला एका मुलाने मारहाण केली होती आणि त्यात दुर्दैवाने या मातेचा मृत्यू झालेला होता. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सी एस मोहिते यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून सखाराम यादाजी शिंदे ( वय 32 राहणार लोणी तालुका परतुर ) असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.
उपलब्ध माहितीनुसार, परतूर तालुक्यातील लोणी येथील रहिवासी असलेला सखाराम शिंदे हा 5 ऑगस्ट 2021 रोजी दारू पिण्यासाठी घरातील धान्य घेऊन जात होता. धान्य विकून दारू पिणारा मुलगा पाहिल्यानंतर त्याच्या आई असलेल्या वृन्दावनी यांनी त्याला विरोध केला त्यावेळी त्याने आईला जोरदार मारहाण केली त्यानंतर त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही म्हणून त्यांना जालना येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने त्यांचा त्यात मृत्यू झाला.
सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा आरोपीच्या विरोधात नोंदविण्यात आलेला होता मात्र वृंदावनी यांचा मृत्यू झाल्यानंतर खुनाच्या कलमाची नोंद वाढविण्यात आली त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले त्यात दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सखाराम शिंदे याला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.