चोरीचा एक अजब प्रकार लातूर येथे उघडकीला आलेला असून धारदार शस्त्राचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे दोन कोटी 98 लाख रुपयांचा माल चोरट्यांनी घेऊन पलायन केले आहे. विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून घरात इतकी मोठी रक्कम असल्याची चोरट्यांना कल्पना होती त्यावरून हा पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, राजकमल अग्रवाल ( वय 32 वर्ष ) असे तक्रारदार व्यक्तींचे नाव असून कातपुर रोड परिसरात कनया नगरातील अग्रवाल यांच्या बंगल्यात बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाच दरोडेखोर दाखल झाले होते. त्यांनी राजकमल अग्रवाल यांना जागे करून त्यांच्या गळ्याला चाकू लावला आणि त्यांच्या पत्नी मुलगा आणि इतर सदस्यांचे मोबाईल काढून घेतले. 12 तारखेला पहाटे ही घटना घडली असून लातूरमध्ये खळबळ उडालेली आहे.
चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे सुमारे दोन कोटी 98 लाख रुपये लुटून त्यानंतर तेथून पलायन केले. धक्कादायक म्हणजे त्यांनी अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबियांना कुठलीही इजा केली नाही उलट त्यांच्या दोन्ही लेकरांची पप्पी घेतली आणि घाबरू नका असेही ते म्हणाले . पतीच्या गळ्यातील लॉकेट देवाचे आहे हो ते तरी लुटू नका अशी विनंती अग्रवाल यांच्या पत्नीने केली त्यावेळी त्यांनी तिच्या गळ्यातील लॉकेट सोडून दिले व इतर ऐवज घेऊन तिथून पलायन केले. सदर घटनेची लातूर मध्ये जोरदार चर्चा सुरू असून अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.