महाराष्ट्रातील अत्यंत खळबळजनक घटना अकोला जिल्ह्यात समोर आलेली असून दारूच्या आहारी गेलेल्या पतीने आपल्या पत्नीवर कुर्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केले होते . सदर घटनेत या महिलेचा मृत्यू झालेला असून अकोला जिल्ह्यातील शेकापुर गावात गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
गोपीचंद राजाराम चव्हाण ( वय 35 राहणार शेकापुर तालुका पातुर जिल्हा अकोला ) असे मारेकरी पतीचे नाव असून संगीता गोपीचंद चव्हाण ( वय 28 ) मयत महिलेचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपला पती आपल्याला त्रास देत आहे आणि जीवे मारण्याची धमकी देतो यासाठी या महिलेने अनेकदा पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवले होते मात्र सालाबादप्रमाणे पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली.
काय आहे पूर्ण प्रकरण ?
आरोपी गोपीचंद आणि संगीता यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झालेला होता. सुरळीतपणे संसार सुरू असताना गोपीचंद याला दारूचे व्यसन लागले आणि तो दारू पिणे यावरून सातत्याने तिला त्रास देऊ लागला. दारूच्या नशेत असल्याने महिलेने अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष केले मात्र त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देणे सुरू केले त्यानंतर ती पोलिसात दाखल झाली मात्र पातूर पोलिसांनी कुठलीही ठोस कारवाई केली नाही आणि अखेर संगीता तिच्या दोन मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली.
बायको माहेरी गेल्यानंतर पुन्हा एकदा गोपीचंद तिथे पोहोचला आणि तिने त्याच्यासोबत पुन्हा नांदायला सुरुवात केली. बारा तारखेला त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले त्यावेळी आरोपी गोपीचंद याने गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास संगीता हिच्या डोक्यात मानेवर आणि कमरेवर वार केले त्यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. याआधी देखील गोपीचंद ह्याच्यावर सासर्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत संगीता यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती मात्र पोलिसांनी केवळ थातूरमातूर उत्तरे दिली असा आरोप आता मयत महिलेच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हा झाल्यावरच पाहू अशा स्वरूपाचे पोलिसांचे वर्तन घातक असून समाजात गुन्हेगारीचे प्रमाण रोखणे हे देखील पोलिसांचे काम आहे याचा पोलिसांना विसर पडल्याचे दिसून येत आहे.