शेअर मार्केटमध्ये अडकवण्यासाठी म्हणून घेतलेले पैसे परत देता आले नाहीत म्हणून एकाचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा प्रकरणात फरार असलेला पुण्यातील गुंड गजानन पंढरीनाथ मारणे ( वय 42 राहणार कोथरूड ) याला सातारा जिल्ह्यातील वाई परिसरात अटक करण्यात आलेली आहे.
गजानन याच्या शोधासाठी शहर गुन्हे अन्वेषण विभागाची पथके त्याचा शोध घेत होते. वाई येथील एका वकिलाच्या फार्महाऊसवर गजानन थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून हाती लागली आणि त्यानंतर त्यांनी वाईजवळील बावधन परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. वकिलाकडे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी म्हणून गजानन गेलेला होता अशी माहिती समोर आलेली आहे.
शेअर मार्केटमध्ये पैसे अडकवण्याचा बहाणा करत एका व्यक्तीने पैसे घेतले आणि त्यानंतर ते पुन्हा परत केले नाहीत त्यानंतर खंडणीसाठी गजानन मारणे याच्या सहकाऱ्यांनी त्या व्यक्तीचे अपहरण केले आणि त्याला धमकावले म्हणून गजानन आणि त्याच्या 14 साथीदारांच्या विरोधात 11 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आतापर्यंत आठ साथीदारांना पोलिसांनी अटक केलेली असून इतर मात्र फरार आहेत.