लाच घेताना अधिकारी व कर्मचारी लोकांना लाज का वाटत नसावी हे देखील एक कोडे आहे . ताज्या घटनेत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील नगरपालिकेच्या नगररचना विभागातील अभियंता व त्याच्या पंटरला वीस हजारांची लाच स्विकारताना कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले. अभियंता बबन खोत व त्याचा पंटर किरण कोकाटे अशी या दोघांची नावे असून गेल्या अनेक दिवसांपासून ते विभागाच्या रडारवर होते.
शहरातील एका नागरिकाने नगररचना विभागाकडे गुंठेवारीचे प्रकरण मार्गी लावण्यासाठी फाईल दिली होती. यासाठी संबंधित व्यक्तीकडून २५ हजारांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. मंगळवारी कोकाटेच्या माध्यमातून ही रक्कम अभियंता बबन खोत घेणार होता .संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आणि सापळा रचण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून पालिका कर्मचाऱ्याच्या कामकाजाबाबत तक्रारी सुरू होत्या. पालिकेत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली होती. कोल्हापूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, शरद पुरे, विकास माने, सुनील घोसाळकर, मयूर देसाई, रुपेश माने यांनी ही कारवाई केली.