पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण नुसती माफी मागून चालणार नाही. तुमच्या चुकीमुळे 700 कुटुंबांना नुकसान भोगावं लागत आहे. त्यामुळे त्यांना पीएम केअर फंडातून तातडीने आर्थिक मदत करा, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, ‘ तीन कृषी कायद्याविरोधात रस्त्यापासून संसदेपर्यंत आंदोलन झालं. सरकार ऐकायला तयार नव्हतं. पण शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे सरकार झुकलं. या आंदोलनात शेतकरी मृत्यू झाले. 700 हून अधिक शेतकरी दगावले. आता जर केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी होत असेल तर त्यात चूक काय आहे? पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडले आहेत. त्यातून या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी. देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागून चालणार नाही. त्यासाठी मदत करा. तुम्ही जी चुकी केली त्याचं नुकसान 700 कुटुंबांना भोगावा लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे ‘.
‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत सुधारत आहे. त्यांच्याशी काल रात्री बोलणं झालं. लवकरच ते घरी जातील. त्यांनी संपूर्ण बरे होऊन कामाला लागवं. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच कामाला सुरुवात करावी. एसटी कामगारांच्या संपावर तोडग्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते दिवस रात्र बैठका घेत आहेत. काही संघटना आणि राजकीय पक्ष आडमुठेपणाने वागत असतील तर त्यातून अडथळे निर्माण होतात . ‘