महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असतानाच अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात उघडकीस आली आहे .कापुरबावडी घोडबंदर रोड भागात असलेल्या एका शॉपिंग शॉपमध्ये तेथील स्टाफची नजर चुकवत एका अनोळखी महिलेने शॉपमधील ९९ हजारांचा लॅपटॉप घेऊन पोबारा केल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी घडली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत महिलेला अटक केली असून सदर महिला ही उच्चशिक्षित असून तीने घोडबंदर भागातील दोन दुकानात चोरी केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , फाडफाड इंग्रजी बोलणारी ही महिला चोरी करत असेल असा कुणाला संशय देखील येणार नाही असे तिचे वर्तन होते.घोडबंदर येथील कापूरबावडी भागात एका मॉलमध्ये ३ नोव्हेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास दिवाळीच्या खरेदी निमित्ताने मॉलमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत तिने एक लाखाचा लॅपटॉप लंपास केला. १५ नोव्हेंबरला याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि पोलीस तपास सुरु झाला.
पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्नीकरण तपासणी केली. त्यावेळी एक महिला हा लॅपटॉप दुकानाबाहेर घेऊन जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. मात्र चेहऱ्यावर मास्क लावलेल्या महिलेने चेहऱ्यावर मास्क लावला असल्याने तिचा तपास पोलिसांना करणो कठीण जात होते. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महिला ही मुलुंड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी कारवाई करत तिला जेरबंद केले. कसून चौकशी केली असता महिलेने गुन्ह्याची कबूली दिली. तिला अटक करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.