नगरमध्ये एक खळबळजनक अशी घटना उघडकीला आलेली असून तोफखाना पोलीस ठाण्यात एका आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीएसआयची ट्रेनिंग सुरु होणार असून लवकरच मी आता पीएसआय होणार आहे असे सांगत या तरुणाने एका तरुणीशी लग्न केले आणि त्यानंतर तो पुण्याला निघून गेला. तो पुन्हा आला नाही आणि आपल्याला भेटणे देखील तो टाळत असल्याने पीडित तरुणीने त्याच्या विरोधात तोफखाना पोलिसात फिर्याद दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, किरण मुरलीधर राहते ( राहणार देवळा तालुका जुन्नर जिल्हा पुणे ) असे आरोपीचे नाव असून नगर येथील ही तरुणी पुण्यात शिक्षणासाठी गेली होती त्यावेळी त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले त्यानंतर त्याने या तरुणीला लग्नाची मागणी घातली आणि त्यांचे फेब्रुवारी 2021 मध्ये लग्न देखील झाले मात्र त्यानंतर ट्रेनिंगसाठी आपण पुण्याला जातोय असे सांगून तो निघून गेला आणि त्याने या तरुणीला टाळण्यास सुरू केले.
वारंवार संपर्क करून देखील तो आपल्याला सतत टाळत आहे हे लक्षात आल्यावर तरुणीने ही बाब वडिलांना सांगितली आणि त्यांनी मुलाच्या आई-वडिलांशी संपर्क केला त्यावेळी तो त्यांनी आमचा मुलगा हा पीएसआय नाही तर तो एका खाजगी कंपनीत काम करतो असे सांगितले. मुलीच्या वडिलांनी आमची फसवणूक केलेली आहे असे म्हटल्यानंतर त्यांना शिवीगाळ देखील करण्यात आली तसेच मुलीलाही शिवीगाळ करण्यात आली. संतप्त झालेल्या या मुलीने अखेर पोलिसात फिर्याद दिली असून पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.