सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर येथे समोर आली असून मुलाच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आलेल्या अधिकार्‍याच्या पत्नीने सोलापूर येथे आत्महत्या केली आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव हे पत्नीसोबत शनिवारी सोलापूर येथे आले होते मात्र रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची पत्नी सुनीता जाधव ( वय 45 ) यांनी विजापूर रोडवरील एका हॉटेलमधे गळफास घेतला.

उपलब्ध माहितीनुसार, प्रभू जाधव यांच्या मुलाचा 11 डिसेंबर रोजी विवाह पार पडणार होता त्यासाठी ते कर्नाटक येथून कपडे खरेदी करण्यासाठी सोलापूर येथे आले होते. जाधव यांच्या पत्नीचे माहेर सोलापूरच असून कपडे खरेदी करून जाण्याच्या नियोजनात असताना त्यांनी सुरेगाव परिसरातील निशा हॉटेलमध्ये रूम भाड्याने घेतली होती.

आत्महत्या करण्यापूर्वी सुनीता यांनी त्यांच्या भावाला फोन करून मी आत्महत्या करत आहे असे सांगितले. भाऊ त्यांना समजावून सांगत होता मात्र सुनिता यांनी फोन बंद केला त्यानंतर त्यांच्या भावाने परिसरातील नातलगांना या प्रकाराची कल्पना दिली आणि नातेवाइकांनी तात्काळ हॉटेलकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत सुनिता यांचा मृत्यू झालेला होता. विजापूर नाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.