महिलांना राजकारणात आल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अनेक वेळा हा विरोध देखील घरातून देखील केला जातो . अशीच एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उघडकीस आली असून मरळगोई (खु) येथील महिला सरपंच असलेल्या योगीता अनिल फापाळे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडलेली असून पती यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांना अटक केली आहे.
मृत योगीता यांचे भाऊ संतोष गवळी यांनी फिर्यादीत सांगितलं की, ‘माझी बहीण योगीता गावच्या सरपंच झाल्यापासून सासरच्या मंडळींकडून तिला वारंवार त्रास दिला जात होता. किरकोळ कारणातून आणि चारित्र्याच्या संशयातून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून योगिता हिने मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास विष प्राशन केलं त्यात तिचा मृत्यू झाला.
मृत योगिता यांचा भाऊ संतोष शांताराम गवळी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी, पती अनिल बाबासाहेब फापाळे, सासरे बाबासाहेब फापाळे, सासू सरला फापाळे आणि दीर प्रदीप फापाळे यांच्याविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पती अनिल फापाळे याच्यासह सासरच्या तिघांना अटक केली आहे . सासरच्या मंडळींच्या विरोधात कौटुंबीक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.