नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून पैशाच्या वादातून एका तरुणाचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याला अमानुष मारहाण करून बेशुद्ध अवस्थेत घरासमोर फेकून देत आरोपींनी पळ काढला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकलेल्या असून 15 डिसेंबरपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तुषार अण्णासाहेब दरेकर ( राहणार हिरडगाव तालुका श्रीगोंदा ) असे मयत तरुणाचे नाव असून 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती . 9 डिसेंबर रोजी सकाळी तुषार दरेकर हा कामासाठी बाहेर पडलेला होता त्यानंतर रात्री पावणे नऊच्या सुमारास मयत तरुणाच्या भावाने त्याला फोन केला त्यावेळी तो श्रीगोंदा येथील एका हॉटेलमध्ये जेवण करत होता असे त्याने फोनवर सांगितले.
रात्री दहाच्या सुमारास त्याची आई यांना घराकडे एक पिकअप आल्याचे दिसले. ही पिकअप मुख्य आरोपी असलेला अण्णा भाऊसाहेब साने याची होती त्यावेळी त्याच्या सोबत परशुराम दादा गुणवरे, शिवाजी भास्कर दरेकर, सतीश रामदास दरेकर ( सर्वजण राहणार हिरडगाव ) हेदेखील त्याच्या सोबत होते चारही आरोपींनी तुषार दरेकर याला पाठीमागून बाहेर काढून टाकले आणि त्यानंतर तेथून पलायन केले.
आईने आपल्या मुलाला बेशुद्ध अवस्थेत पाहून तिथेच हंबरडा फोडला आणि तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात घेऊन जाताना त्याचा मृत्यू झालेला होता. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.