पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांची प्राणज्योत मालवली

मुक्ता टिळक

भाजपच्या आमदार व माजी महापौर मुक्ता शैलेश टिळक यांचे गुरूवारी दीर्घ आजाराने निधन झाले असून त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, मुलगी चैत्रीली टिळक, सून, जावई असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या मात्र आज दुपारी त्यांची खासगी रूग्णालयात प्राणज्योत मालवली. शुक्रवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत नारायण पेठेतील त्यांच्या निवास स्थानी त्यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू श्रीकांत टिळक यांच्या सूनबाई आहेत. पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले आहे.मुक्ता टिळक यांचे पतीही भाजपमध्ये सक्रिय आहेत.