पुण्यात एक खळबळजनक अशी घटना काही दिवसांपूर्वी उघडकीला आली होती. पुणे स्टेशन येथून एका दोन वर्षाच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तब्बल बारा दिवस शोध घेत अखेर या बाळाला ताब्यात घेऊन त्याच्या आईच्या ताब्यात दिले आहे. 22 डिसेंबर रोजी पोलिसांनी आरोपीला पकडले असून तब्बल बारा दिवस रेल्वे पोलिस पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत होते.
आपल्या कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी एक दांपत्य झारखंड इथून पुणे इथे आले होते त्यानंतर ते झारखंड येथे जात असताना त्यांच्यासोबत त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा होता. रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळील जिन्याजवळ एक महिला आणि पुरुष त्यांच्याकडे आले आणि त्यांनी मुलासोबत बोलण्याचा बहाणा करत त्याला खाऊ आणतो म्हणून घेऊन गेले ते पुन्हा आलेच नाही. मुलाच्या आई-वडिलांनी बराच वेळ त्यांची वाट पाहिली आणि अखेर रेल्वे पोलिसात तक्रार दिली.
रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांना देखील माहिती दिली आणि त्यानंतर रिक्षाचालक, हॉटेल वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी तपास केला मात्र तक्रार देण्यासाठी मुलाच्या आई-वडिलांनी वेळ घेतल्याने अपहरणकर्ते पळून गेले. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद कोपिकर यांनी मात्र याप्रकरणी कसून चौकशीला सुरुवात केली.
तब्बल बारा दिवस तांत्रिक तपासाच्या आधारे अपहरण झालेला मुलगा एक महिला आणि एका पुरूष यांच्यासोबत रांजणगाव परिसरात असल्याची माहिती हाती लागल्यानंतर पोलिसांनी तात्काळ वेळ न दवडता रांजणगाव गाठले आणि आरोपींना अटक केली. विजय अनंत जयस्वाल आणि सुमन शर्मा ( वय 40 ) अशी आरोपींची नावे असून त्यांना मूलबाळ होत नसल्याने त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.