महाराष्ट्रातील एका खळबळजनक हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून कोकणातील रायगड जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. आंघोळीला गेलेल्या पत्नीने गळफास घेतला असा बनाव तिच्या पतीने निर्माण केलेला होता मात्र पोलीस तपासात थंड डोक्याने पतीने तिचा खून केल्याचे समोर आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सतीश म्हात्रे आणि त्याचा भाऊ संदेश चव्हाण अशी आरोपींची नावे असून मयत महिलेच्या कपाळावर एक व्रण आढळून आलेला होता त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ऋणाली म्हात्रे असे मयत पत्नीचे नाव असून मुलाला थंड पाण्याने अंघोळ घातली होती म्हणून संतापलेल्या पतीने तिची हत्या केली आणि त्यानंतर तिला गळफास लावून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला मात्र पोलिसांनी त्याचा हा बनाव हाणून पाडला. पेण तालुक्यातील देवर्षी नगर येथील ही घटना आहे.
16 डिसेंबर रोजी सकाळी हा प्रकार घडला होता आणि वडखळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र सुरुवातीपासून पोलिसांना हा प्रकार आत्महत्या नसून खून असल्याचा संशय होता त्यानंतर पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. याच दरम्यान मयत महिलेच्या कपाळाला इजा असल्याचा धागा समोर ठेवून पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यावेळी त्यांनी या खुनाची कबुली दिली आहे.