शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत इतरही काही आरोपींनी या मुलीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, अनिल जाधव असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याने एका अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत तिचे अपहरण केले आणि बाणेर परिसरातील तुकाई मंदिर टेकडी आणि औंध येथील कबुतराच्या रूममध्ये तिच्यावर जुलै महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत सतत अत्याचार केले. विशेष म्हणजे त्याने या प्रकाराचे फोटो काढले आणि ते आपल्या मित्रांमध्ये व्हायरल करण्याची तो मुलीला धमकी देत होता.
23 डिसेंबर रोजी त्याने मुलीला एका ठिकाणी बोलावले . ओम राजू तिंबोळे, जय राजू तिंबोळे, अनिल जाधव, सुनील जाधव, शुभम आणि किरण जावळे ( सर्वजण राहणार औंध ) यांनी तिच्यावर बलात्कार केला. सामूहिक अत्याचाराचा त्रास तिला होऊ लागल्याने तिने या प्रकरणी आईला सांगितले आणि आईने पोलिसात धाव घेत आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून पोलिस तपास सुरू असल्याची माहिती आहे.