प्रेयसीसोबत राहण्यासाठी आपल्या मित्राचा खून करून त्याला आपले कपडे घालून जणू आपलाच खून झालेला आहे असा आभास करून फरार झालेल्या पुण्याच्या आजोबांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. मित्राचा खून केल्यानंतर त्याला आपले कपडे घालून चक्क ओळख पटू नये म्हणून मयत व्यक्तीला रोटावेटर मशीनमध्ये फिरवण्यात आले आणि त्यानंतर आजोबा प्रेयसीसोबत पळून गेले. आळंदी येथे फ्लेक्स बोर्ड लावून मयत नसलेल्या या आजोबाना भावपूर्ण श्रद्धांजली देखील व्यक्त करण्यात आली. श्रद्धांजलीच्या फ्लेक्सवरील मजकूर हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
मयत नसलेल्या आजोबांसाठी लावण्यात आलेल्या या फ्लेक्स बोर्डवर , ‘ आपला सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील.. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुमची आठवण येत राहील ‘ असा हा मजकूर लिहिलेला असून त्याच्या बाजूला भावपूर्ण श्रद्धांजली असे मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे सोबतच मयत नसलेले आजोबा सुभाष थोरवे याचा फोटो देखील लावलेला आहे व दहाव्याची वेळ देखील लिहलेली असून मृत्यूची तारीख १६ डिसेंबर लिहलेली आहे . सोशल मीडियावर या फ्लेक्स बोर्डची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे नावाच्या व्यक्तीस अटक केली असून या घटनेत रवींद्र भीमाजी घेनंद नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. खून केल्यानंतर आरोपी फरार झाला आणि मयत झालेल्या व्यक्तीवर मृत्यूनंतर केले जाणारे सगळे विधीही करण्यात आले. अगदी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचे बॅनरही गावात लावण्यात आले आणि दशक्रिया विधीही उरकला गेला.
सुभाष थोरवे याची प्रेयसी ही शेतात काम करणारी महिला असून ती शेतकामासाठी येत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले होते. त्यांच्यातील ह्या प्रकाराची खबर थोरवेंच्या पत्नी आणि मुलांनाही लागली आणि मुलांनी त्यांचा संसार वेगळा थाटला मात्र पत्नीला हे पचनी पडत नव्हतं यातूनच त्याच्या पत्नीने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली मात्र उलट या घटनेनंतर सुभाष यास कुणाचाच धाक राहिला नाही म्हणून याचा फायदा घेत त्याने प्रेमसंबंध असणाऱ्या विवाहित महिलेसोबत गावापासून लांब जाऊन राहण्याचा डाव आखला होता .
अंत्यविधी झाल्यावर सुभाष आणि त्यांची प्रेयसी एकत्र भेटले आणि त्याने तिला पुढील प्लॅन समजावून सांगितला मात्र खून केलेला असल्याने प्रेयसीने काहीतरी करून वेळ मारून नेली आणि माहेरी निघून गेली . सुभाष याच्याकडे आता काय करायचे हा प्रश्न असल्याने तो त्याच्या बहिणीकडे गेला मात्र त्याचा अवतार खराब झालेला असल्याने नागरिकांनी त्याला चोर समजून मारहाण केली. त्याला नागरिकांनी ओळख विचारली त्यावेळी त्याने इथे आपली बहीण राहत आहे असे सांगितले. चोप देणाऱ्या नागरिकांनी बहिणीला बोलावले त्यावेळी ज्याचा दशक्रिया विधी केला तोच भाऊ जिवंत पाहून तिला चक्कर आली. याच ठिकाणावरून आळंदी पोलिसांना याबाबत कल्पना देण्यात आली आणि सुभाष यास अटक करण्यात आली.