औरंगाबाद येथे खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली असून वाढदिवसाच्या पार्टीसाठी दिलेल्या जेवणाचे बिल मागितले म्हणून केटरिंग व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला आमदाराच्या मुलाने हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे. माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट असे या धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून सदर धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे.
एकनाथ शिंदे गटाचे आमदार असलेले संजय शिरसाट यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी काही वर्षांपूर्वी आमदार यांच्या वाढदिवसासाठी पार्टी दिली होती. तक्रारदार असलेले त्रिशरण सत्यवान गायकवाड यांना या पार्टीचे कॉन्टॅक्ट देण्यात आले होते. 2017 साली ही पार्टी संजय शिरसाट यांच्या वाढदिवसासाठी देण्यात आली होती त्यावेळी जेवणाचे बिल साडेचार लाख रुपये झाले होते. तक्रारदार यांच्याकडे मागणी करण्यात आल्यावर त्यांनी 75 हजार रुपये कमी देखील केले होते मात्र उर्वरित पैसे त्यांना देण्यात आले नाहीत.
17 डिसेंबर रोजी तक्रारदार यांनी पुन्हा सिद्धांत शिरसाट यांना पैशाची मागणी केली त्यावेळी त्यांनी फोनवरून हात-पाय तोडण्याची धमकी दिली असे तक्रारदार यांचे म्हणणे असून त्यांच्याविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाणे इथे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे मात्र पोलिसांकडून कारवाई झालेली नाही म्हणून आपण या पोलीस आयुक्तालयात देखील यासंदर्भात तक्रार करणार आहोत असे देखील तक्रारदार यांनी म्हटले असून सदर प्रकरणी तपास सुरू आहे.