बसमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या विकृत व्यक्तींची काही कमी नाही. अनेकदा महिलांसोबत अरेरावीची भाषा वापरत शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न अनेक जण बसमध्ये करत असतात. अशीच एक घटना पुण्यात समोर आलेली असून पुणे महापालिकेपासून तळेगाव ढमढेरे येथे जाणाऱ्या एका बसमध्ये महिलेशी लगट करणाऱ्या एका आरोपीला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, नवल बाळकृष्ण पाटील ( वय 48 राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. पीडित महिला पुणे महापालिका ते तळेगाव ढमढेरे या बसमध्ये प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेत त्याने आपल्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला असे महिलेचे म्हणणे असून त्यानंतर महिलेने आरडाओरडा सुरू केला होता.
तिचा आरडाओरडा ऐकल्यानंतर आरोपी हा बसमधून उतरला आणि फरार झाला. पोलीस ठाण्यात याप्रकरणी खबर दिली आणि पोलिसांनी एक जणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस तपास सुरू असताना सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याची ओळख पटवण्यात आली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.