आपल्या श्रीमंतीचा आणि ऐश्वर्याचा गर्व हा अनेकांना असतो आणि गा गर्वातूनच अनेकदा इतरांना हिणवण्याचे प्रकार समोर येत असतात असाच काहीसा प्रकार पुण्याच्या डेक्कन परिसरात हा प्रकार घडला आहे. एका वकिलाने ऑडी कार चालवणाऱ्या व्यक्तीला पत्ता विचारला म्हणून संबंधित व्यक्तीने वकिलाला मारहाण केली. तुला कळतं का, कोणाला काय प्रश्न विचारतो? ऑडी चालवणाऱ्याला तू असा प्रश्न कसा विचारु शकतो, असे म्हणत गाडीच्या चालकाने वकिलाला बेदम मारहाण केली.
विशाल शंकर सोनवणे (४२) यांनी डेक्कन पोलिसात तक्रार दिली असून फिर्यादी डेक्कन परिसरात उभे असताना त्यांनी एका व्यक्तीला ज्ञानमुद्रा टिटोरियल क्लासचा पत्ता विचारला होता. याचा राग मनात धरून ऑडी गाडी (एम एच १४ आर एफ ६६८५) चालकाने “तुम्हाला समजते का, तुम्ही कोणाला पत्ता विचारत आहात, आम्ही ऑडी चालवणारे लोक आहोत” असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली आणि मुद्दाम कार वेगाने घेऊन जात गाडीचे चाक फिर्यादीच्या पायावरून नेले. सदर प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.