देशात काळा पैसा कोण कुठे आणि कसा लपवेल याचा भरवसा राहिलेला नाही. अशीच एक घटना बिहार इथे उघडकीस आली असून अवघ्या आठ वर्षांपूर्वी शिक्षकाच्या नोकरीला लागलेल्या गुरुजींकडे सापडलेला पैसा आणि सोने पाहिले तर विश्वास बसणार नाही. आयकर विभागाने बिहारच्या या श्रीमंत गुरुजींवर छापा टाकून घबाड ताब्यात घेतले आहे
.
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील भथहरमध्ये हा शिक्षक नोकरी करत असून शिक्षकाचे नाव नीरज कुमार शर्मा असल्याचे समजते. पाटन्यातील बहादुरपूर एसबीआय शाखेत त्याच्या नावे लॉकर होते. सदर शिक्षकाच्या लॉकरमध्ये बराच ‘ माल ‘ असल्याची आयकर विभागाला टीप मिळाली आणि त्याच्या आधारे कारवाई करण्यात आली.
लॉकरमध्ये चक्क 1 कोटी कॅश, 250 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 4 विटा आणि अन्य कागदपत्रे देखील आढळून आली. एका शिक्षकाकडे एवढी रोख रक्कम कशी आली, सोने कसे खरेदी केले आदी कागदपत्रे त्याला सादर करता आली नसून एक महिन्याच्या आत या शिक्षकाला कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहेत.
अचानक झालेल्या कारवाईने हा शिक्षक हादरून गेला असून त्याने हा आपला नसून हा पैसा त्याचा मावस भाऊ राजद आनंदचा असल्याचे सांगितले आहे . राजद आनंद याची कंस्ट्रक्शन कंपनी असून आपण या कंपनीत संचालक म्हणून आपण बिना वेतनावर असल्याचे म्हटले आहे. एका महिन्याच्या आत यासंबंधीचे कागद आयकर विभागाला आल्यानंतरच यामागील सूत्रधार समजणार आहे.