महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे श्री धीरेंद्र कृष्णजी महाराज यांच्या उपस्थितीत श्री रामकृष्ण प्रवचन आयोजित केलेले आहे मात्र राम कथेच्या नावावर दिव्य दरबार आणि प्रेत दरबार देखील आयोजित केलेला असल्याने हा दरबार चांगलाच चर्चेत आलेला असून धीरेंद्र कृष्णजी महाराज यांचे हे दावे आणि प्रयोग म्हणजे महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्याचे तसेच मॅजिक रेमेडीज कायद्यानुसार गुन्हा आहे. महाराजांनी त्यांची दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवावी आणि तीस लाख रुपयांचे बक्षीस मिळवावे असे खुले आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि राष्ट्रीय संघटक प्राध्यापक शाम मानव यांनी दिलेले आहे.
श्याम मानव हे राज्य सरकारच्या जादूटोणा कायदा जनजागृती प्रचार अभियानाचे सहसदस्य आणि अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी या कायद्यानुसार प्रमुख दक्षता अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे या महाराजांच्या गुन्ह्याविषयी तपशील दाखल केलेला असून पत्रकार परिषदेत हे आव्हान दिलेले आहे . दिव्य दरबार आणि प्रेत दरबार यामुळे कायद्याचे उल्लंघन होत आहे असे देखील त्यांनी म्हटलेले असून पोलिसांना कारवाईचे आवाहन केलेले आहे.
श्याम मानव म्हणाले की, ‘ दिव्यशक्ती हे आतापर्यंत कुणीही सिद्ध केलेली नाही जर महाराज ते सिद्ध करू शकत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. त्यांनी देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारावे आणि तीस लाख रुपयांचे पारितोषिक मिळवावे. महाराज यांना कदाचित ही रक्कम छोटी वाटत असेल तरी रकमेसाठी नाही तर किमान त्यांच्या दिव्यशक्तीच्या दाव्यासाठी तरी त्यांनी ही कला लोकांसमोर सादर करावी आणि हे सिद्ध झाले तर आपण देखील त्यांच्या पाया पडू आणि समितीचे काम देखील बंद करू . देवा धर्माला आमचा अजिबात विरोध नाही मात्र देवाधर्माच्या नावावर जनतेची फसवणूक होत असेल आणि जनतेला जाळ्यात ओढून त्यांचे शोषण होत असेल तर जनताही विरोध करील मात्र समिती आपले प्रबोधनाचे कार्य करत राहील, ‘ असे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे.