पुणे शहरातील सामूहिक आत्महत्या प्रकरणात आता वेगळाच ट्विस्ट आलेला असून इंजिनीअर तरुणाने आपल्या शिक्षणासोबत शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला. आणि पैसेही कमवले मात्र बाजारात सातत्याने मंदी येत गेल्याने तो निराशेत गेला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. आई-वडील आणि बहिणीसह स्वतःच्याही जेवणात विष कालवून संपूर्ण कुटुंबच संपवलं असून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातलं हे कुटुंब होतं.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील रविदास नगर येथील रहिवाशी दीपक थोटे यांच्या कुटुंबाची स्थिती अतिशय गरीबीची होती. त्यांच्याकडे कुठलीही शेती नव्हती. त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण दर्यापूर या ठिकाणी पूर्ण केले आणि मुलाला इंजीनिअर बनवले आणि एक मुलगी ही शिक्षण घेत होती. मुलगा ऋषिकेश थोटे हा इंजिनीअर झाल्यानंतर त्याने शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला. त्यामध्ये त्याला आधी नफा मिळत गेला.
ऋषिकेशला वारंवार शेअर मार्केटमध्ये नफा दिसत होता. त्याने दर्यापूर शहरातील कित्येक लोकांपासून पैसा घेतला आणि तो पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला. नंतर ऋषिकेश हा आपल्या कुटुंबाला घेऊन एक वर्षापूर्वी पुण्यात राहण्यासाठी गेला मात्र शेअर मार्केटमध्ये मंदी आल्याने ऋषिकेश थोटे हा पूर्णतः हवालदिल झाला होता. लोकांपासून लाखो रुपये घेतल्याने पैसा आता कसा परत करावा? या चिंतेत ऋषिकेश होता. पण या संकटातून बाहेर पडण्याऐवजी त्याने संपूर्ण कुटुंबच संपवण्याचा निर्णय घेतला .
ऋषिकेश याने जेवणात विष कालवलं आणि या घटनेत थोटे कुटुंबातील चारही सदस्यांचा धक्कादायक मृत्यू झाला. दीपक थोटे ( वय साठ ) इंदू दीपक थोटे ( वय 45) त्यांचा मुलगा ऋषिकेश दीपक थोटे ( वय 24 ) आणि मुलगी समीक्षा दीपक थोटे ( वय 17 ) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ते मुंढवा परिसरातील केशवनगर येथे राहायला आलेले होते.