बसमधील ‘ प्रेम ‘ कोथरूड पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

पुणे शहरातील आणि परिसरातील बसमध्ये महिलांसोबत गैरवर्तन करण्यात येत असल्याचे अनेक प्रकार याआधी देखील समोर आलेले आहेत मात्र पुन्हा एकदा असाच प्रकार कोथरूड परिसरात उघडकीला आलेला असून सातत्याने पाठलाग करून बस प्रवासामध्ये धक्का मारून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या माथेफिरू व्यक्तीला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, प्रेम चंदू पवार ( वय 29 राहणार पिरंगुट ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने त्याच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिलेली आहे. पीडित मुलगी ही नळस्टॉप बस वरून ये जा करत असते. 12 तारखेला बसने जात असताना पवार याने तिच्यासोबत बोलण्याचा बहाना केला आणि माझ्यासोबत मैत्री करशील का ? असे विचारत तिचा हात हातात पकडला आणि माझ्यासोबत चल तुला चहाची पार्टी देतो, असे देखील तो म्हणाला.

पीडित मुलगी आपल्याकडे दुर्लक्ष करते आहे हे लक्षात येऊन देखील त्याने पुन्हा 14 तारखेला ती बसने प्रवास करत असताना तिचा पाठलाग करत तिच्याकडे पाहून वेगवेगळे स्वरूपाचे हावभाव केले आणि तिचा विनयभंग केला. घरी आल्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला त्यानंतर कुटुंबीयांनी कोथरूड पोलिसात जात त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे समजते.


Spread the love