मोबाईल चोरी झाल्यानंतर अनेक नागरिक पोलिसात देखील धाव घेत नाहीत कारण पोलीस मोबाईल शोधून देतील यावर त्यांचा विश्वास नसतो. पोलिसांकडे असलेले अपुरे संख्याबळ यामुळे किरकोळ प्रकरणात पोलीस जास्त लक्ष देत नाहीत असा समज खोटा ठरवत बारामती पोलिसांनी एका व्यक्तीचा मोबाईल त्याला सुपूर्त केलेला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी यासंदर्भात एक शक्कल लढवली होती त्यामुळे हा मोबाईल चक्क कुरिअरने त्यांना पाठवण्यात आला असून मोबाईलची किंमत 45 हजार रुपये आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सायबर सेलच्या मदतीने हा मोबाईल सुरू असलेल्या व्यक्तीची माहिती मागवलेली होती. बऱ्याच प्रकरणात मोबाईल चोरी झाल्यानंतर परराज्यात विकला जातो आणि लांबचा प्रवास असल्याने हा खर्च परवडत नसल्याने पोलीस अधीक्षक यांनी ज्यांच्या ताब्यात हा मोबाईल आहे त्यांना फोन करून कारवाईचा इशारा देण्याचे आदेश दिलेले होते त्यानंतर सदर व्यक्तीने हा मोबाईल पुन्हा बारामतीला पाठवून दिलेला आहे.
बारामती येथील न्यायालयात काम करणारे आकाश संजय खंदारे यांचा मोबाईल 14 नोव्हेंबर 2022 रोजी चोरी झालेला होता आणि त्यानंतर तो मोबाईल तामिळनाडू येथे ॲक्टिव्ह असल्याची माहिती त्यांना समजली. पोलीस अधीक्षक गोयल यांनी तामिळनाडूच्या त्या मोबाईल धारकाला फोन केला आणि कारवाई संदर्भात त्याला इशारा दिला. लवकरात लवकर हा मोबाईल बारामतीला पाठवून द्यावा अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितल्यानंतर मोबाईल वापरणारा व्यक्ती गडबडून गेला आणि त्याने तात्काळ पत्ता विचारत हा मोबाईल पुन्हा बारामतीला पाठवून दिला.
सायबर पोलीस ठाणे बारामती शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, दशरथ इंगवले यांनी या कारवाईत सहभाग घेतलेला होता पोलिसांच्या या अनोख्या पॅटर्नचे कौतुक केले जात असून नागरिकांनी मोबाईल चोरी झाल्यानंतर न घाबरता पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी असेही पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.