महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पनवेल येथे उघडकीला आलेली असून एका महिलेला रिक्षातून घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्यावर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही महिला घरी निघालेली असताना एक रिक्षाचालक तिथे आला आणि त्याने तिला घरी सोडण्याचा बहाना केला. त्याच्यासोबत एक मित्र होता. त्यांनी एका निर्मनुष्य परिसरात जाऊन इमारतीच्या छतावर तिच्यासोबत बलात्कार केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेले असून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही एका लेडीज बारमध्ये वेटर म्हणून काम करते. अविनाश चव्हाण ( वय 22 ) आणि सुरज देवडे ( वय 21) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून 30 जानेवारी रोजी मध्यरात्री हा प्रकार घडलेला आहे. खोपोली येथील एका लेडीज बारमध्ये ही महिला वेटर म्हणून काम करते . रविवारी रात्री महिला कामावरून घरी जात असताना ओरियन मॉल इथे थांबलेली होती त्यावेळी रिक्षाचालक तिथे मित्रासोबत आला आणि त्यांनी तिला घरी सोडण्याचा बहाना केला मात्र तिने सांगितलेल्या पत्त्यावर रिक्षा न नेता त्यांनी इतरत्र रिक्षा वळवली आणि तिला एका बिल्डिंगच्या टेरेसवर नेले.
टेरेसवर नेल्यानंतर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिथून पळ काढला. आपल्यासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर महिला घाबरून गेली आणि तिने तात्काळ पोलीस ठाणे गाठत दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आणि आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना बेड्या ठोकल्या. महिला सुरक्षेचा प्रश्न महाराष्ट्रात दिवसेंदिवस गंभीर होत असून रात्री अपरात्री कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना अशा अनेक विकृत लोकांचा त्रास सहन करावा लागतो. मद्यधुंद अवस्थेत रात्री अनेक जण असे फिरत असून पोलिसांकडून गस्त घातली जाते मात्र अपुरे मनुष्यबळ असल्याने पोलिसांच्या देखील कारवाईला मर्यादा येत आहेत.