शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून 41 वर्षीय व्यक्तीने आपल्यासोबत आपली 29 वर्षाची प्रेयसी बोलत नाही म्हणून तिच्या घरासमोर जाऊन धिंगाणा घातलेला आहे. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत भाऊ पाटील रस्त्यावर एका उच्चभ्रू सोसायटीच्या खाली हा प्रकार घडलेला असून त्यानंतर प्रेयसीने पोलिसात तक्रार दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तक्रारदार प्रेयसी हिचे वय 29 वर्ष असून तिचा प्रियकर 41 वर्षांचा आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध असून काही कालावधी प्रेमात गेल्यानंतर अखेर त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर या प्रेयसीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले. तीन दिवसांपासून ती बोलत नसल्याने हा प्रियकर हतबल झालेला होता म्हणून त्याने तिला फोन केले मात्र तिने त्याचे फोन उचलले नाही त्यानंतर त्याची सटकली आणि तो चक्क ती राहते त्या फ्लॅटच्या खाली आला आणि तिथे त्याने तिच्या नावाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या प्रेयसीच्या फ्लॅटच्या खाली आला आणि त्यानंतर त्याने धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. काहीही करून तू माझ्यासोबत बोल असा त्याचा आग्रह होता मात्र तरीदेखील ती बोलत नाही म्हटल्यानंतर त्याने तिच्या नावाने शिवीगाळ सुरू केली. प्रियकराच्या या धिंगाण्यानंतर अखेर तिने खडकी पोलीस ठाण्यात जाऊन आपली तक्रार नोंदवली त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि सीआरपीसी 149 नोटीस देऊन सोडून दिले.