ओमिक्रॉनची दहशत..अखेर मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

Spread the love

आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ उडाली असून अमेरिकेसह कॅनडा व इतर देशांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे . भारत देखील ओमिक्रॉनला गांभीर्याने घेत असून मुंबई महापालिकेने ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉन व्हेरियंट बाधित आढळल्यास संबंधित पूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे करण्यात येणार आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत घरी विलगीकरणात ठेवण्यात येणार नाही. दुर्दैवाने या नव्या व्हेरियंटने बाधित रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसेच कोविड उपचार केंद्रांचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे. ‘

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली होती . बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेने विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करुन मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये जे प्रवासी विदेशातून आले आहेत, त्यांची यादी सर्व महानगरपालिकांना उपलब्ध करुन देण्याची सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिली. अति जोखमीच्या देशातून गेल्या १४ दिवसांतून आलेल्या प्रवाशांची देखील यादी विमानतळाकडून घेण्याच्याही सूचना देण्यात आली आहे. कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट सापडलेल्या १० देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व महानगरपालिकांनी सहायक आयुक्तांच्या माध्यमातून घ्यावी असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


Spread the love