संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झालेल्या भिवंडी येथील अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी तब्बल एक महिना पूर्ण परिसर पिंजून काढून अखेर या मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात सोपवले होते. सदर प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेला असून त्याने एक लाख पाच हजार रुपयांना या मुलाची विक्री केलेली होती. दोन महिला देखील या प्रकरणात आधीच गजाआड झालेल्या आहेत.
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेला आरोपी हा तोच आहे याची खात्री करण्यासाठी पोलीस प्रशासनाने भिवंडी शहरात प्रत्यक्ष घटनास्थळावर आरोपीला नेऊन त्याच्याकडून चालण्याची चाचणी करून घेतलेली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील हालचाली त्याच्याच असल्याची न्यायालयाला खात्री पटावी म्हणून पुन्हा एकदा त्याच्याकडून पोलिसांनी ‘ कॅटवॉक ‘ करून घेतलेला आहे. प्रत्यक्ष गुन्हा करताना ज्या ठिकाणावरून हा प्रकार घडला त्या ठिकाणावरच पोलिसांनी याच्याकडून ही रिहर्सल करून घेतली .
भिवंडी येथे कामतघर परिसरात 26 डिसेंबर रोजी एका दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला होता. पोलिसांनी कारवाई करत अखेर या मुलाची सुटका केलेली असून अपहरण करणाऱ्या व्यक्तीसोबत दोन महिलांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली होती .सुंदरी रामगोपाल गौतम या यांच्या राहत्या घरात कपडे धुत असताना त्यांचा दीड वर्षांचा मुलगा सिद्धांत याचे घराच्या बाहेरून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलेले होते त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल होत गुन्हा नोंदवला आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
गणेश मेमूला नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले त्यानंतर त्याची कसून तपासणी केली त्यावेळी त्याने आपण हे मूल एक हजार एक लाख पाच हजार रुपयांना एका व्यक्तीला विकल्याचे कबूल केले. पोलीस पथकाने त्यानंतर तात्काळ पद्मा नगर परिसरात नवजीवन कॉलनी येथे भारती साहू ( वय 41) आणि आशा साहू ( वय 42 ) या दोघींना ताब्यात घेतले आणि त्यांच्या ताब्यातून या मुलाची सुटका करण्यात आली.सिद्धांत याचे वडील पानटपरीचा व्यवसाय करत असून अचानकपणे मुलगा बेपत्ता झाल्यानंतर कासावीस झालेले होते. व्यवसाय बंद करून त्यांनी भिवंडी ठाणे कल्याण भिवंडी परिसर पिंजून काढला होता मात्र तरी देखील तो आढळून आला नाही त्यामुळे अन्न पाणी देखील सोडले होते.