महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना मुंबई इथे उघडकीस आली होती.चार दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला येथील एचडीआयएल परिसरातील एका 13 मजली इमारतीच्या टेरेसवर एका 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. आरोपींनी मृत मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या एका मित्राला अटक केली असताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
आरोपींनी मुलीची हत्या केल्याचे सांगितले असले तरी आम्ही तिच्यावर बलात्कार केला नाही असे म्हटले आहे तसेच मृत मुलगी लग्नासाठी सतत तगादा लावत असल्याने तिची हत्या केली, असे देखील आरोपींनी पुढे म्हटले आहे. त्यामुळे मयत मुलीवर बलात्कार कोणी केला ? याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे .
मृत मुलीच्या मोबाइल सीडीआरमधून गोवंडी येथील तिचा प्रियकर रयान खान (19) याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला व त्याच्या मित्राला जेरबंद केले होते. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 6 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा पुढील तपास विनोबा भावे नगर पोलिसांसह, कुर्ला आणि धारावी पोलीस संयुक्तपणे करत आहेत.
25 नोव्हेंबर रोजी काही तरुण इन्स्टाग्राम व्हिडीओ बनवण्यासाठी कुर्ला येथील एचडीआयएल परिसरातील बंद पडलेल्या 13 मजली इमारतीत गेले होते. संबंधित तरुणांना इमारतीच्या टेरेसवरील लिफ्ट रुममध्ये एका 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आणि त्यांनी तात्काळ या घटनेची पोलिसांना माहिती दिली. मयत मुलगी ही देवनार येथील असून पोलिसांनी तिची ओळख पटताच अवघ्या काही तासांमध्येच आरोपीना जेरबंद केले मात्र आता बलात्कार कोणी केला ? याचा देखील पोलीस तपास करत आहेत .