कैसर भाई यांची पैसे पाहून नियत बदलली नाही अन..

Spread the love

देशात रोज सायबर गुन्हेगारी वाढत असताना अशा व्यक्तींच्या डोळ्यात अंजन घालणारी एक बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे उघडकीला आलेली असून मोबाईल क्रमांकामधील एक नंबर चुकीचा टाकण्यात आल्याने एका व्यक्तीला तब्बल 19 हजार रुपये चुकून ट्रान्सफर झालेले होते त्यानंतर या व्यक्तीला फोन करून सदर प्रकाराची कल्पना देण्यात आल्यानंतर कुठलीही ओळख नसताना या व्यक्तीने दोन दिवसात हे पैसे परत केलेले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार चांदुर रेल्वे येथे रहिवासी असलेले विजय अजमिरे यांनी फोन पे मधून पेमेंट करत असताना त्यांच्याकडून एक नंबर चुकीचा टाकण्यात आला आणि ते पैसे औरंगाबाद येथील रहिवासी असलेले कैसर जिलानी यांना चुकून ट्रान्सफर झाले. 25 जानेवारी रोजी आपल्या खात्यात 19 हजार रुपये आल्यानंतर कैसर हे देखील गडबडून गेले मात्र त्यानंतर अवघ्या काही वेळात अजमेरे यांचा त्यांना फोन आला आणि त्यांनी हा प्रकार आपल्याकडून चुकून घडलेला आहे असे सांगितले.

कैसर जिलानी यांनी त्यानंतर तात्काळ त्यांना काहीच काळजी करू नका. माझ्या खात्यात आता पैसे आलेत की नाही हे मी पाहिलेले नाही. बँकेत जाऊन कन्फर्म केलेले नाही ते एकदा कन्फर्म करतो आणि आले असतील तर नक्की तुम्हाला पैसे परत करीन कुठलीच चिंता करू नका , असे सांगितले त्यानंतर कैसर यांनी बँकेत जाऊन कन्फर्म केल्यावर खात्यात पैसे आल्याचे लक्षात आल्यावर 27 जानेवारी रोजी सर्व रक्कम पुन्हा अजमेरे यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केलेली आहे. विजय अजमेरे यांनी कैसर जिलानी यांचे आभार मानलेले असून जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे असे म्हटलेले आहे.


Spread the love