शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेला असून महावितरणच्या अघोरी खेळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आधीच नुकसान होत आहे त्यात एक आणखीन नवीन प्रकार समोर आलेला असून लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे हे प्रकरण समोर आलेले आहे. गावात सातत्याने चोरी होत असल्याने दहशतीच्या वातावरणात असलेल्या ग्रामस्थांमध्ये चोर आल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर गावकऱ्यांनी चोर शोधण्यास सुरुवात केली.
25 जानेवारी रोजी ही घटना उघडकीला आलेली असून पानचिंचोली येथील शिवाजी जाधव यांच्या घरात चोरी झालेली होती त्यानंतर परिसरातील एटीएम फोडण्याच्या देखील काही घटना समोर आल्यानंतर पोलिसांकडून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आणि तरुणांनी गावात गस्त घालायला सुरू केली. नवीन वाहन दिसल्यानंतर ग्रामस्थांकडून या वाहनाची चौकशी करण्यात येत होती मात्र त्यातून टवाळकी देखील सुरू झाली.
एक फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास ग्रामसुरक्षा दलाने एक मेसेज व्हायरल केला त्यामध्ये परिसरातील एका धनराज गिरी नावाच्या शेतकऱ्यांच्या ज्वारीच्या शेतात काही चोर लपलेले आहेत असा असा मेसेज त्यांनी सोशल मीडियात व्हायरल केला त्यानंतर गावातील सुमारे 500 ते 600 नागरिक हातात लाठ्या-काठ्या घेऊन तात्काळ या ज्वारीच्या पिकात घुसले आणि पीक पायाखाली तुडवले. कोणतेच चोर सापडले नाहीत मात्र शेतकऱ्याचे तीन एकर रब्बी ज्वारीचे पीक यामुळे उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्याने या प्रकरणी संताप व्यक्त केलेला असून प्रशासनाने आपल्याला मदत करावी असे आवाहन केलेले आहे.
ग्रामसुरक्षा दलाची स्थापना ही चोरी रोखण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली असली तरी त्यावर बऱ्याच अंशी कुणाचेही नियंत्रण नसल्याने तसेच बहुतांश ग्रामस्थांमध्ये व्हाट्सअप मेसेजवर विश्वास ठेवण्याचे प्रमाण असल्याने याचा गैरफायदा घेत काहीजण असे प्रकार करत आहेत. गावात आलेल्या व्यक्तींची चौकशी करणे इथपर्यंत ठीक आहे मात्र त्याचा फायदा घेत परिसरातील इतर व्यक्तींवर देखील काही कारण नसताना खुन्नस काढण्याचे देखील प्रकार यामुळे घडत असून ग्रामसुरक्षा दलाला देखील सध्या मार्गदर्शनाची गरज दिसून येत आहे.