महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणावरून टोकाचे पाऊल उचलण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे समोर आलेली असून प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने एका उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आपले लग्न प्रियकरासोबत होणार नाही हे लक्षात आल्यानंतर अखेर तिने हे टोकाचे पाऊल उचललेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दीक्षा ( वय 28 ) असे मयत तरुणीचे नाव असून शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलेला आहे. ती आणि तिचा प्रियकर अजय हे एकाच कॉलेजमध्ये कार्यरत होते त्यावेळी ते त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले. कॉलेजमध्ये देखील अनेक जणांना या प्रकरणाची माहिती होती आणि लवकरच ते लग्न करतील अशी देखील चर्चा होती. दोन्ही कुटुंबीयांच्या घरी समजल्यानंतर दीक्षा हीच्या कुटुंबीयांकडून या प्रकरणाला प्रथम विरोध करण्यात आला मात्र अखेर त्यांनी देखील संमती दिली मात्र तरुणाच्या कुटुंबाकडून या लग्नाला विरोध होत होता.
मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही असे दीक्षा हिने त्याला अनेकदा सांगितलेले होते मात्र अखेर त्याने घरच्यांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही असे सांगत हात वर केले त्यामुळे ती हतबल झालेली होती. ज्याच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला त्यानेच अखेर दगा दिला यामुळे ती हमसून हमसून रडू लागली. शनिवारी रात्री तिच्या राहत्या घरात तिने गळफास घेतली आणि सुसाईड नोटमध्ये कारणदेखील लिहून ठेवले. तिच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या प्रियकराला देखील अश्रू अनावर झालेले होते. शांतीनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पोलीस तपास करत आहेत.