पुण्यात खळबळ..उजनीच्या पाण्याजवळ मृतदेहाचे पाच तुकडे , शीर गायब

Spread the love

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारवाडी गावच्या हद्दीत धारदार शस्त्राने तुकडे करून पिशवीत भरलेल्या अवस्थेत मृतदेह उजनीच्या पाण्यात आढळून आलेला आहे. मासे वाहून नेण्याच्या प्लास्टिक पिशवीत धड आणि हातपायाचे ५ तुकडे सापडले असून भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतलेली आहे.

उजनीच्या फुगवट्याशेजारी एका प्लास्टिक पिशवीत हा मृतदेह आढळून आला असून त्यात पुरुष जातीच्या शरीराचे हात पाय आणि धड असे ५ तुकडे आढळून आले आहेत मात्र मुंडके आढळून आले नाही. भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला असून हा मृतदेह साधारण ३० ते ३५ वर्ष वयाच्या पुरुषाचा असल्याचे बोलले जात आहे . मयताच्या उजव्या हाताचे मनगटाच्या पाठीमागे टॅटू काढलेला आहे. मयताची ओळख अद्याप पटलेली नसून यासाठी नागरिकांना पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी आवाहन केले आहे.

अत्यंत निर्दयीपणे मृतदेहाचे तुकडे केले असून मांडीपासून पायाचे तर खांद्यापासून हाताचे दोन तुकडे केले आहेत तर मुंडके मानेतून कापण्यात आले आहे. प्रकरणाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटनास्थळी भेट देत गुन्ह्याची माहिती घेतली.भिगवण पोलीस ठाण्यात तक्रारवाडी गावचे पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरु करण्यात आला आहे .


Spread the love