पुणे शहरात येऊन व्यवसाय करून इच्छिणाऱ्या अनेक नागरिकांना स्थानिक व्यक्तींकडून दमदाटी केली गेल्याची अनेक प्रकरणे आधी समोर आलेली आहेत. असेच एक प्रकरण सध्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीला आलेले असून सदर प्रकरणी तक्रारदार यांनी न भिता तक्रार दिल्यानंतर दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन लाखांची खंडणी त्यांनी चेकच्या माध्यमातून घेतलेली होती आणि उर्वरित राहिलेली अडीच लाखाची खंडणी मिळावी म्हणून ते तक्रारदार यांची अडवणूक करत होते.
उपलब्ध माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती यांनी नगर रोडवरील फिनिक्स मॉल येथे शोरूमचे इंटेरियरचे काम घेतलेले होते . तिथे सहा तारखेला सदर कामासाठी प्लायवूडने भरलेला ट्रक आला तेव्हा आरोपी रवी ससाने ( राहणार चंदननगर ) आणि त्याचा साथीदार मंगल सातपुते ( राहणार लोहगाव ) यांनी तिथे येऊन आम्ही इथले स्थानिक आहोत त्यामुळे आम्हाला आठ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल असे म्हटलेले होते . तक्रारदार हे आरोपींनी त्यांना दमदाटी केल्यानंतर अखेर साडेचार लाख खंडणी देण्यास तयार झालेले होते त्यातील दोन लाख रुपये आरोपींनी चेकच्या माध्यमातून घेतली आणि उर्वरित अडीच लाखांसाठी तक्रारदार यांना फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास त्यांनी सुरू केलेले होते.
तक्रारदार यांनी अखेर पोलीस आयुक्त पुणे शहर यांना या संदर्भात तक्रार दिली आणि पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत रवींद्र उर्फ रवी जयप्रकाश ससाने ( राहणार चंदन नगर पुणे ) आणि मंगल सातपुते ( राहणार लोहगाव पुणे ) यांना तात्काळ बेड्या ठोकलेल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.