दापोडी परिसरात एका दाम्पत्याचा एका माथेफिरू व्यक्तीने अमानुषपणे खून केलेला होता. सदर प्रकरण समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली होती. मयत व्यक्ती यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केलेली असून त्यासंदर्भात पोलिसांची भेट त्यांनी घेतलेली आहे. त्याने केलेल्या दाव्यात कितपत तथ्य आहे याचाही पोलीस सध्या शोध घेत असून परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने केलेले दावे हे बिनबुडाचे असून मयत दाम्पत्याची एक प्रेमळ नागरिक म्हणून परिसरात ओळख होती.
दापोडी दुहेरी हत्याकांडातील आरोपी प्रसन्ना प्रमोदराव मंगरूळकर दिल्लीहून आल्यावर पुणे विमानतळावरून चार तासांहून अधिक वेळ पायी चालत गेला असे भोसरी पोलिसांना त्याने सांगितले आहे . मंगरूळकर याने विश्रांतवाडी परिसरातील एका दुकानातून टिकाव विकत घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आरोपीच्या प्रत्येक हालचालीची आणि शब्दाची चौकशी करत आहेत कारण त्याने परस्परविरोधी दावे केलेले आहेत.खून केल्यानंतर त्याला तात्काळ बेड्या ठोकण्यात आलेल्या होत्या.
काटे कुटुंबीयांच्या दारात पोहोचताच मंगरूळकर याने दरवाजा ठोठावला मात्र संगीता यांनी दार उघडताच त्याने त्यांच्याकडे टिकाव भिरकावला त्यात त्या जखमी झाल्या. रहिवाशांनी आरडाओरडा सुरू होताच काही अंतरावर रिक्षात असलेले त्याचे पती शंकर काटे धावत आले तेव्हा आरोपीने त्यांच्यावरही वार केले आणि त्यांचा यात मृत्यू झाला. दापोडी आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काटे यांचे असंख्य नातेवाईक आहेत त्यांनी देखील आरोपीच्या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे सांगितले आहे .
मयत दाम्पत्याचा मुलगा आकाश यांनी सांगितले आहे की , ‘ घटना घडली त्या दिवशी मी विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या राहुल कलाटे यांच्या कामात व्यस्त होतो. मी दुपारी माझ्या वडिलांना फोन केला तेव्हा त्यांनी मला सांगितले की ते विश्रांती घेत आहेत. मी त्यांच्याशी केलेला हा शेवटचा संवाद होता. रात्री दहाच्या सुमारास मला एका नातेवाईकाचा फोन आला. मी घाईघाईने घरी पोहोचलो तेव्हा मला माझे आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. सोबतच रहिवाशांनीच मारेकऱ्याला पकडले , असेही त्यांनी सांगितले आहे .
आकाश काटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना . “मला न्याय हवा आहे. मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझे आईवडील साधे जीवन जगले. त्यांनी कधीही कोणाला दुखवले नाही. दापोडीतील सर्वांनी त्यांचा आदर आणि कौतुक केले,” असे सांगितले असून परिसरात त्यांची एक प्रेमळ कुटुंब म्हणून ओळख असल्याची देखील माहिती आहे .
एका शेजाऱ्याने सांगितले की, “अवघ्या तीन मिनिटांत कोणी काही करू शकण्याआधीच त्याने दोघांची हत्या केली. हे इतक्या झपाट्याने घडले की कोणीही ते रोखू शकत नव्हते. कारण तो काय करतोय हे कोणालाच कळले नाही. तो भानावर नसलेला किंवा खूप मद्यधुंद झालेला दिसत होता. त्यांच्यात भाडे देण्यावरून वाद झाला म्हणून ते निघून गेले होते कदाचित यामुळे मारेकऱ्याने राग बाळगला असावा. पण त्याचा हेतू काय होता हे आम्हाला माहीत नाही .’
तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांनी सांगितले की, “मंगरूळकर ला स्थानिक न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आमच्या तपासादरम्यान त्याने आम्हाला सांगितले की, तो दिल्लीहून विमानाने आला होता. यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. त्याने सांगितले की तो आणि त्याची आई काही वर्षांपूर्वी काटे यांचे भाडेकरू होते. दापोडीत राहिल्यानंतर ते तळेगावला राहत असल्याचे त्याने सांगितले आहे . 2019 मध्ये त्याच्या आईचे निधन झाले तेव्हा अंत्यविधीसाठी फक्त तो आणि त्याचे काका उपस्थित होते , असेही पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे .